जपानच्या संशोधकांनी केला प्रतिसेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्पीड मिळाल्याचा दावा


टोकियो : तंत्रज्ञानामध्ये अनेक विक्रम जपानने प्रस्थापित केले आहेत. सर्वात वेगवान बुलेट ट्रेनही जपाननेच विकसित केली आहे. आता जपानने आणखी एका वेगवान विक्रमाला गवसणी घालण्याचा दावा केला आहे. जपानने प्रति सेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्पीड साध्य केल्याचे म्हटले आहे. म्हणजे एका सेकंदात दहा हजार एचडी चित्रपट डाऊनलोड होऊ शकणार आहेत. यात 1,864 मैल लांबीच्या ऑप्टिकल केबलचा वापर करण्यात आला आहे. हा वेग आतापर्यंतचा सर्वाधिक मानला जात आहे. हा स्पीड मिळाल्यानंतर तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल होतील.

1,864 मैलांच्या ऑप्टिकल केबलच्या माध्यमातून जपानी संशोधकांनी डाटा ट्रान्सफरच्या गतीचा विक्रम केला आहे. हे एवढे जलद आहे की सरासरी 4 जीबी असलेल्या 10,000 हाय डेफिनिशन चित्रपट केवळ एका सेकंदात डाऊनलोड करू शकता. अशा प्रकारचे तंत्रज्ञान ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या बॅक-एंड नेटवर्कमध्ये वापरले जाते आणि नंतर शेकडो किंवा हजारो ग्राहकांमध्ये विभाजित होते.

पूर्वीचे प्रतिसेकंद 172 टेराबाईटचा विक्रम या नवीन विक्रमाने मोडीत काढला आहे. हा विक्रम अगोदर जपानची राष्ट्रीय माहिती व दळणवळण संस्थेच्या नावावर होता. नवीन प्रणाली विद्यमान पायाभूत सुविधांशी सुसंगत आहे, म्हणजे नेटवर्क सहजपणे अपग्रेड केले जाऊ शकते, कारण केबल समान आकाराचे आहे, असे टीमने स्पष्ट केले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की बॅक-एंड-इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अशा प्रकारची गती आवश्यक असेल कारण, इंटरनेट सेवा मागणाऱ्यांना जास्त स्पीडच्या इंटरनेटची आवश्यता असते. यात आता 5G नेटवर्कची वेगवान गती तसेच डाटा ट्रान्सफर आणि इंटरनेट यांचा समावेश आहे.

संशोधकांनी हा वेग मिळवण्यासाठी फोर-कोर ऑप्टिकल फायबर केबलचा वापर केला असून या केबलमध्ये नेहमी वापरण्यात येणाऱ्या सिंगल ट्युबपेक्षा फोर ऑप्टिकल फायबर ट्यूबमध्ये डाटा वाहून नेण्याची क्षमता अधिक असल्यामुळे जास्त अंतरात येणारा सिग्नलमध्ये अडथळा दूर झाला आहे. नवीन तंत्रज्ञाना मागील रेकॉर्ड ब्रेकिंग सिस्टमसारखेच आहे. फक्त यात आणखी एक कोर आहे. त्यानंतर डेटा ‘वेव्हलेन्थ-डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग’ वापरुन प्रसारित केला जातो, हे तंत्रज्ञान लेसरद्वारे डेटा बीम घेते आणि 552 चॅनेलमध्ये विभाजित करते.