‘टू चाइल्ड पॉलिसी’वर मुनव्वर राणांची टीका; म्हणतात…यामुळे मुस्लिम आठ मुले जन्माला घालतात


लखनौ – उत्तर प्रदेश सरकारने जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी म्हणजेच ११ जुलै २०२१ रोजी उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३० ची घोषणा केली. विकासाच्या प्रक्रियेतील वाढती लोकसंख्या हाच खरा अडथळा असून लोकसंख्या नियंत्रणासाठी जास्तीत जास्त प्रयत्नांची गरज असल्याचे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे धोरण जाहीर करताना व्यक्त केले होते. विरोधक आणि सत्ताधारी असा वाद यावरुन सुरु अशतानाच आता लोकप्रिय शायर मुनव्वर राणा यांनी या धोरणावरुन योगी सरकारवर टीका केली आहे. दोन मुलांच्या जन्माचे धोरण आखणाऱ्या सरकारला मुस्लिम आठ मुले जन्माला का घालतात हे मला सांगायचे असल्याचे म्हणत राणा यांनी योगी सरकारच्या धोरणावर निशाणा साधला आहे.

मुन्नवर राणा यांनी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील टू चाइल्ट पॉलिसीसंदर्भात आपले मत न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे. मला लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या गोष्टी करणाऱ्या सरकारला हे सांगायचे आहे की मुस्लिम आठ मुले यासाठी जन्माला घालतात कारण त्यांना भीती असते की त्यांची दोन मुले दहशतवादी म्हणून मारली जाऊ शकतात, दोघे कोरोनाने मरु शकतात, मग अशावेळी आई-बापाची पार्थिव स्मशानभूमीपर्यंत पोहचवायला कोणीतरी हवे ना?, असा खोचक टोला राणा यांनी मुलाखतीदरम्यान लगावला आहे.

मुस्लिमांच्या उत्तर प्रदेशमधील परिस्थितीसंदर्भात पुढे बोलताना आता उत्तर प्रदेश मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य ठिकाण नसल्याचे मी मानतो, असेही राणा म्हणाले आहेत. भाजप आणि ओवैसी हे असे दोन कुस्पीपटू आहेत जे केवळ लोकांना दाखवण्यासाठी एकमेकांविरोधात लढत आहेत. मतांचे ध्रुवीकरण व्हावे आणि त्याचा फायदा भाजपाला व्हावा, असे या दोघांचा डाव असल्याचा दावा राणा यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांना थोडी सुद्धा अक्कल असेल तर त्यांनी ओवैसींच्या पक्षाला मतदान करु नये, असे राणा म्हणाले आहेत. मागील काही दिवसांमध्ये राणा यांनी दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईनंतर अटक करण्यात आलेल्या अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांच्या अटकेवरुनही शंका उपस्थित केली होती.

दहशतवादी म्हणून ज्या दोन मुलांना अटक करण्यात आली आहे, ते दोघे एवढे गरीब आहेत की त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांना अल कायदाशी संबंधित असल्याचा ठपका ठेवत ताब्यात घेण्यात आले आहे आणि प्रेशर कुकरला बॉम्ब असे सांगण्यात येत आहे. मी सुद्धा यापूर्वी कार्यक्रमासाठी पाकिस्तानला जायचो. मी काही दिवसांपूर्वी प्रेशर कुकर खरेदी केला आहे. आता दहशतवादी विरोधी पथक मला सुद्धा दहशतवादी आणि तालिबानी समजून उचलून तर घेऊन जाणार नाही ना?, अशी भीती वाटू लागली असल्याचा टोलाही त्यांनी मुलाखतीमध्ये लगावला.