टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी आढळला कोरोनाबाधित रुग्ण


टोकियो – : या वर्षी जपानची राजधानी असलेल्या टोकियो या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा पार पाडणार आहे. ज्या ठिकाणी या स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत त्या गावात कोरोनाबाधित पहिला रुग्ण सापडल्यामुळे ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याचे आयोजकांनी देखील मान्य केले आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलेल्या एका खेळाडूला शुक्रवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पण यावर कोणतेही स्पष्टीकरण आयोजकांनी दिले नव्हते. आता स्पर्धांचे आयोजन ज्या ठिकाणी करण्यात आले आहे, त्या ठिकाणीच कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या एका खेळाडूला या गावातून बाहेर पाठवण्यात आले असून टोकियोमध्ये त्याला एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

स्पर्धेवर असणारे कोरोनाचे सावट लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी एक स्पेशल प्लॅन तयार करण्यात येत असल्याचीही माहिती आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या काळात जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार आहे. जगभरातील क्रीडापटूंचा समावेश असलेले ऑलिम्पिक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजनांसह सज्ज असल्याचे गेल्या आठवड्यातच जपानच्या पंतप्रधानांनी सांगितले होते.

23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक खेळांचे आयोजन होत आहे. या ऑलिम्पिकसाठी विदेशी प्रेक्षकांना येण्यासाठी आधीच बंदी घालण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी आणीबाणी लागू केल्यामुळे टोकियोमधील स्थानिक प्रेक्षकांना येण्यास देखील बंदी असणार आहे. त्यामुळे यंदाचे ऑलिम्पिक प्रेक्षकांविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.