या ऑलिम्पिकमध्ये शेवटची दिली गेली बावनकशी शुध्द सोन्याची मेडल्स

आणखी पाच दिवसांनी जपान मध्ये टोक्यो ऑलिम्पिक २०२० ची सुरवात होत आहे. करोना मुळे यंदा या स्पर्धा वेगळ्या वातावरणात होत आहेत तरी अनेक देशांचे खेळाडू सुवर्णपदकाच्या अपेक्षेने त्यांच्यातील सर्वोत्तम ते देण्यासाठी कसून प्रयत्न करण्यास सज्ज झाले आहेत. अश्या वेळी आठवण येते ती १९१२ मधल्या स्वीडन येथे झालेल्या स्टॉकहोम ऑलिम्पिक्सची. खेळाडूंना अस्सल सोन्याची पदके देणारी ही शेवटची स्पर्धा ठरली.

आज जी सुवर्णपदके दिली जातात त्यावर सोन्याचे पाणी दिलेले असते. आयओसीच्या नियमानुसार सुवर्णपदाकात किमान सहा ग्राम शुद्ध सोने असणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात या पदाकात चांदी जास्त असते. १ टक्का सोने, ९२.५ टक्के चांदी आणि ६.५ टक्के तांबे मिसळून ही पदके बनविली जातात.

स्टॉकहोम ऑलिम्पिक्स अनेक अर्थानी वेगळे होते. स्टॉकहोम ऑलिम्पिक्स हे पाचवे ऑलिम्पिक होते आणि त्यात जगातील सर्व पाच खंडातील खेळाडू सामील होते. ऑलिम्पिकच्या पाच रिंगा हे या पाच खंडाचे प्रतिक आहेत. या स्पर्धेत २८ देशातील २४०० खेळाडू आले होते आणि त्यात ४८ महिला होत्या. येथेच सर्वप्रथम ट्रॅक स्पर्धेत ऑटोमेटर टाईम ट्रॅकिंग मशीन व फोटो फिनिशची सुरवात झाली.

या स्पर्धेतच प्रथम कला स्पर्धा, महिला डायव्हिंग, जलतरण, डेक्थेलॉन, पेन्टेक्थेलॉनची सुरवात झाली होती.