म्हणून साजरा होतो जागतिक सर्प दिवस

जगात एकूण १५०० प्रकारचे विशेष दिवस साजरे केले जातात. १६ जुलै हा दिवस जागतिक सर्प दिवस म्हणून साजरा होतो. साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी अनेक प्रकारचे समज, गैरसमज आहेत. बहुतेक लोकांना या प्राण्यांची भीती वाटते. त्यामुळे ही भीती दूर करून सर्पांविषयी असेलेले गैरसमज दूर करणे आणि त्यासाठी जनजागृती करणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

भारतात नागाला देवता मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. त्या विषयी अनेक दंतकथा सुद्धा आहेत. मात्र तरीही भारतीय जनतेच्या मनात साप नाग याविषयी अनेक गैरसमज आहेत. वास्तविक साप नाग हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत पण त्यांच्याविषयी भीती अधिक असल्याने मोठ्या प्रमाणावर साप नाग मारले जातात.

जगातील जे प्राचीन जीव मानले जातात त्यात साप नाग आहेत. आज घडीला जगात ३४५८ विविध जाती प्रजातीचे साप नाग असून त्यातील ६०० विषारी आहेत. कॅनडाच्या बर्फाळ टुंड्रा पासून अमेझॉन जंगल, वाळवंटे, महासागर असे सर्वत्र साप नाग आढळतात. अतिशय चपळ असे हे शिकारी जीव विविध रंगात आणि आकारात आढळतात. जगातील सर्वात छोटा साप बार्बाडोस थ्रेड स्नेक नावाने ओळखला जातो. तो फक्त चार इंची लांबीचा आहे.

शेतात साप असणे चांगले संकेत आहेत. त्यामुळे पिकाचे आणि धान्याचे नुकसान करणारे उंदीर, घुशी यांचा उपद्रव कमी होतो. तसेच पिकांना धोकादायक किडे सुद्धा साप खातात. साप आणि डायनासोर यांचे पूर्वज एकच म्हणजे सरीसृप नावाचे प्राणी हे अनेकांना माहिती नाही.

चीन मध्ये सापांची शेती केली जाते. भारतात गारुडी समाजाचे लोक साप पाळतात. विषारी साप किंवा नाग चावला तर त्यावर त्वरित उपचार झाले तर माणसाचा जीव वाचतो. साप घरात पाळायला कायद्याने बंदी आहे. तसेच दुर्मिळ जातीचे साप नाग विक्री करण्यावर सुद्धा बंदी आहे. दुर्मिळ सापांची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. नागाचे विष अनेक औषधात वापरले जाते.