मंदाकिनी बॉलीवूड पुनरागमन करणार

राजकपूर यांच्या राम तेरी गंगा मैली चित्रपटातून बॉलीवूड मध्ये प्रवेश केलेली पण आता विस्मृतीमध्ये गेलेली अभिनेत्री मंदाकिनी पुन्हा एकदा बॉलीवूड मध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. पहिलाच चित्रपट सुपरहिट झाल्याने चाहत्यांच्या मनात भरलेली ही अभिनेत्री. आजही अनेक चाहते तिच्या आठवणी काढतात.

मंदाकिनीचे मॅनेजर बाबुभाई थिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदाकिनी सध्या अनेक स्क्रिप्ट वाचत असून दमदार भूमिकेच्या शोधात आहे. फिल्म, वेबसिरीज मध्ये तिला मुख्य भूमिका हवी आहे. तिचा भाऊ भानू याच्या सांगण्यावरून ती पुन्हा चित्रपटात भूमिका करण्यास तयार झाली आहे. कोलकाता येथे दुर्गा पंडाल मध्ये मंदाकिनी गेली होती तेव्हा तिच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडला आणि तेव्हाच तिच्या भावाने तिला पुन्हा अभिनय क्षेत्रात जा असा सल्ला दिला असे समजते.

मंदाकिनी २००२ मध्ये रिलीज झालेल्या बंगाली ‘ से अमरप्रेम’ मध्ये शेवटची दिसली होती. राम तेरी नंतरही तिचे अनेक चित्रपट आले पण ते यशस्वी ठरले नाहीत. गेली १९ वर्षे ती या क्षेत्रापासून दूर आहे.

१९९० मध्ये मंदाकिनीने तिबेटी डॉक्टर काग्युर रिनपोचे यांच्याशी लग्न केले. डॉ. काग्युर योगतज्ञ असून मुंबईत ते तिबेटी हर्बल सेंटर चालवितात. मंदाकीनीचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद बरोबर जोडले गेले होते. त्या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले होते आणि त्यांना एक मुलगा असल्याचे सांगितले गेले होते. मंदाकिनीने मात्र त्याचा इन्कार केला होता. मंदाकिनी स्वतः योग एक्स्पर्ट आहे असेही सांगतात.