ऑगस्टपासून बंद होणार ट्विटरचे ‘हे’ खास फीचर


मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने भारत सरकारसोबत सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान मोठी घोषणा केली आहे. पुढील महिन्यात 3 ऑगस्टपासून फ्लीट्सचे फीचर ट्विटर बंद करणार आहे. मागील वर्षी भारतासह दक्षिण कोरिया, इटली आणि ब्राझील येथे टेस्टिंगसाठी फ्लीट फीचर रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर हे फीचर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जागतिक पातळीवर लॉन्च केले गेले. या फीचरच्या मदतीने 24 तासांनंतर यूजर्सचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट ऑटोमॅटिकली गायब होत होते.

ट्विटरचे फ्लीट्स फीचर यूजर्सना जास्त आकर्षित करू शकले नाही, असे गृहित धरून ट्विटरने हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कंपनीने याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ट्विटरने आपल्या सर्व यूजर्ससाठी फ्लीट्स फीचर जागतिक स्तरावर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांना विनंती केली करत फ्लीट्स फीचर बंद करण्याची मागणी केली. तसेच या बदल्यात एखादे नवीन फीचर आणण्याचीही मागणी त्यांनी केली.

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर जसे स्टोरी टाकल्यानंतर ती 24 तासानंतर आपोआप निघून जाते, त्याच्याशीच साधर्म्य साधत ट्विटरच्या होमपेजवर एकदम वरच्या बाजूस हे फिचर असते. पहिल्या तुमच्या फोटोवर ‘+’ चं चिन्ह दिसेल त्यावर क्लिक केल्यास, जसे तुम्ही ट्विट करता त्यासारखेच 280 शब्दमर्यादा असलेले टेक्स्ट हे Fleets मध्ये लिहू शकता, सोबतच फोटो आणि इतर गोष्टी तिथे टाकण्याचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील, तुम्हाला हवा तो मजकूर, फोटो तुम्ही निवडला की खालील बाजूस fleet हे बटन दिसेल ते दाबताच, तुमच्या स्टोरीला म्हणजेच ट्विटरच्या fleets मध्ये तुमचा कॉन्टेन्ट दिवसभरात 24 तासासाठी दिसेल. एका पेक्षा अधिक fleet तुम्ही add करू शकता.