टी-सिरीजचे भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल


टी-सिरीज कंपनीचे दिवंगत मालक गुलशन कुमार यांचा मुलगा आणि टी-सिरीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार यांच्यावर टी-सिरीज या कंपनीत काम करण्याचे आमिष देत ३० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. भूषण कुमार यांच्यावर हे गंभीर आरोप पीडित महिलेने केले आहेत. आरोपानुसार, भूषण कुमार यांनी काम देण्याच्या नावाखाली २०१७ ते ऑगस्ट २०२० (३ वर्षे) पर्यंत महिलेवर अत्याचार केले आहेत.

त्या महिलेने आरोप केला की तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला आहे. भूषण कुमार यांनी तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिल्याचे त्या महिलेने सांगितले आहे. अंधेरीतील डीएन नगर पोलिसांनी भूषण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भूषण केवळ टी-सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर नाही, तर अनेक बड्या चित्रपटांच्या निर्मितीची जबाबदारीही ते सांभाळतात. भूषण कुमार बऱ्याच वेळा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. १३ फेब्रुवारी २००५ रोजी भूषण यांनी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या खोसला कुमारसोबत लग्न केले. दिव्या बर्‍याचदा तिचे म्युझिक व्हिडिओ आणि इतर प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असते.