प्रख्यात अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन


मुंबई : आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने प्रख्यात अभिनेत्री आणि टीव्ही मालिकेतील एक मोठं नाव असलेल्या सुरेखा सिक्री यांचे निधन झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. गेल्या वर्षी त्यांना ब्रेन स्ट्रोकच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.

सुरेखा सिक्री यांना अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांची ‘बालिका वधु’ सारख्या मालिकेतील भूमिका आजही लक्षात राहते. आतापर्यंत अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. आयुषमान खुराना प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातील सुरेखा सिक्री यांची भूमिका विशेष लक्षात राहते.

या आधीही 2018 साली सुरेखा सिक्री यांना पहिल्या ब्रेन स्ट्रोकला सामोरे जावे लागले होते. गेल्या वर्षी त्यांना दुसरा ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांची तब्बेत गुंतागुंतीची झाली होती. त्यामुळे त्यांचे आजारपण बळावले. आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.

अल्मोरा आणि नैनिताल या ठिकाणी सुरेखा सिक्री यांचे बालपण गेले. त्यांचे वडील एअर फोर्समध्ये होते, तर आई या शिक्षिका होत्या. अलिगढ मुस्लिम विद्यापीठीतून सुरेखा सिक्री यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला. सुरेखा सिक्री यांना 1989 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. सुरेखा सिक्री यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.