अनिल देशमुखांच्या संपत्तीवर ईडीने केली जप्तीची कारवाई!


मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याआधीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर ईडीने छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले असताना आता ईडीने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी करण्यात आली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची ही मालमत्ता आहे. तसेच ही मालमत्ता मुंबई आणि नागपूरमधील असल्याची माहिती मिळत आहे.

ईडीने अनिल देशमुख यांना आत्तापर्यंत तीन वेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. तसेच, अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील अशाच प्रकारचे चौकशीसाठीचे समन्स बजावण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी काही दिवसांपूर्वीच ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. दिवसभर ही कारवाई झाल्यानंतर संध्याकाळी माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरच आरोप केले होते.

ईडीने आज जप्त केलेल्या ४ कोटी २० लाखांच्या मालमत्तेमध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये वरळीतील १ कोटी ५४ लाख रुपयांचा फ्लॅट आणि २ कोटी ६७ लाख रुपये किंमतीची रायगडच्या उरणमधील जमीन यांचा समावेश आहे. सचिन वाझे यांच्या मदतीने अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारचालकांकडून अवैधरीत्या ४ कोटी ७० लाख रुपये जमा केले. तसेच, दिल्लीतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी ४ कोटी १८ लाख रुपये जमवले असून ते श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टमध्ये आल्याचे भासवले, असे ईडीकडून सांगतण्यात आले आहे.

आज जप्त करण्यात आलेला वरळीमधील फ्लॅट अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावाने रजिस्टर असून या फ्लॅटची पूर्ण रक्कम २००४ मध्ये रोख स्वरूपात देण्यात आली होती. पण, तरीदेखील त्याचे विक्रीखत थेट फेब्रुवारी २०२०मध्ये करण्यात आले. अनिल देशमुख यावेळी राज्याचे गृहमंत्री होते. तसेच, अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ५० टक्के मालकी अवघ्या १७.९५ लाख रुपयांना खरेदी केली. पण, त्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास ५ कोटी ३४ लाखांच्या घरात असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही तर सुरुवात असल्याचे म्हणत माझ्या माहितीप्रमाणे १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती ईडीकडे आली आहे. आज ४ कोटी जप्त झाले आहेत, येत्या काही दिवसांमध्ये ते १०० कोटींपर्यंत जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ईडी अनिल देशमुखांना अटक करेल, असा दावा या कारवाईनंतर केला आहे.