स्मार्ट किचन साठी इंडेनचा स्मार्ट सिलिंडर आला

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या इंडेन स्मार्ट सिलिंडरची बाजारात एन्ट्री झाली असून हा सिलिंडर स्मार्ट किचनच्या गरजा लक्षात घेऊन तयार केला गेला आहे. कंपोझीट सिलिंडर असे त्याचे नामकरण केले गेले आहे. या सिलिंडरचे विशेष म्हणजे बाहेरून सुद्धा किती गॅस शिल्लक आहे हे समजू शकणार आहे. शिवाय हा सिलिंडर नेहमीच्या सिलिंडरच्या तुलनेत अधिक मजबूत आणि सुरक्षित आहे असे सांगितले जात आहे.

या सिलिंडर मध्ये ब्लो मोल्ड हाय डेन्सिटी पॉलीइथाईलीनचे अंतर्गत आवरण असून त्यावर फायबर ग्लास  आणि बाहेर पुन्हा पहिल्याच मटेरिअलचे जॅकेट दिले गेले आहे. सध्या वापरात असलेले सिलिंडर लोखंडी आहेत मात्र हे नवे सिलिंडर वजनाला हलके असल्याने अधिक सोयीचे आहेत.

या सिलिंडरचा काही भाग पारदर्शी आहे. त्यातून किती गॅस शिल्लक आहे ते दिसेल. हे सिलिंडर गंजत नाहीत अथवा त्यांचे डाग घरातील फरशीवर पडत नाहीत. सध्या हे सिलिंडर दिल्ली, गुरुग्राम, हैद्राबाद, फरीदाबाद, लुधियाना वितरकांकडे उपलब्ध आहेत. ५ व १० किलो वजनाचे हे सिलिंडर लवकरच देशभरात उपलब्ध होणार आहेत. १० किलोचे सिलिंडर फक्त घरगुती वापरासाठी आहेत. जुन्या सिलिंडरच्या बदली हे सिलिंडर घेता येतील मात्र १० किलो सिलिंडरसाठी ३३५० व ५ किलो साठी २१५० रुपये सुरक्षा ठेव जमा करावी लागणार आहे.