रावण होता पहिला कावडीया?

२२ जुलै पासून नियोजित असलेल्या पवित्र कावडी यात्रेवर उत्तराखंड सरकारने करोना मुळे बंदी घातली आहे तर उत्तर प्रदेशने काही अटींवर त्याला परवानगी दिली असल्याच्या बातम्या आपण वाचतो आहोत. दरवर्षी श्रावण महिन्यात होणाऱ्या या १३ दिवसीय यात्रेचा संबंध महादेव आणि पवित्र गंगा नदी यांच्याशी आहे. श्रावणात प्रतिपदेपासून त्याची सुरवात होते आणि चतुर्दशीला शिवपिंडीवर पवित्र गंगाजलाचा अभिषेक केल्यावर तिची सांगता होते. हरिद्वार, गोमुख, गंगोत्री या ठिकाणी जाऊन कावडिये गंगेचे पवित्र जल घागरीत भरून घेतात आणि स्वतःच्या गावाजवळ असलेल्या किंवा प्रसिद्ध शिवमंदिरात जाऊन ते महादेवाला अर्पण करतात.

प्राचीन ग्रंथात या यात्रेचे उल्लेख सापडतात. त्यानुसार लंकाधिपती रावण हा पहिला कावडीया मानला जातो. समुद्रमंथन झाले तेव्हापासून ही प्रथा आहे असे मानतात. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष महादेवाने गळयात ठेवले पण त्यामुळे महादेवाच्या शरीरात नकारात्मक उर्जा निर्माण झाली. ती दूर करण्यासाठी शिवभक्त रावणाने तप करून गंगाजल कावडीतून आणले आणि पुरा महादेव मंदिरात शिवाला त्याचा अभिषेक केला. त्यामुळे महादेव नकारात्मक उर्जेतून मुक्त झाले अशी कथा सांगतात.

इंग्रजांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकात या यात्रेचे उल्लेख आहेत. अनेक ठिकाणी चित्रातून आणि शिल्पातून या यात्रेचे पुरावे मिळतात. पूर्वी धनी लोक साधूंच्या मदतीने ही यात्रा करत पण १९८० च्या दशकापासून त्याचे मोठ्या प्रमाणावर धार्मिक आयोजन केले जाते. दरवर्षी लाखो कावडिये ही यात्रा करतात. बांबूच्या दोन टोकांना दोन, गंगाजल भरलेल्या घागरी बांधून खांद्यावरून ही कावड पायी चालत नेली जाते. मात्र आजकाल यातही आधुनिकपणा आला आहे. कावडिये मोटर बाईक, ट्रक अश्या वाहनातून सुद्धा कावडी नेतात.