बेजोसबरोबर अंतराळ प्रवासाला जाणार १८ वर्षीय ऑलीव्हर

नेदरलँड्सचा १८ वर्षीय ऑलीव्हर डायमन अमेझॉनचे संस्थापक आणि ब्लू ओरिजिन स्पेस कंपनीचे प्रमुख जेफ बेजोस यांच्यासोबत पहिल्या अंतराळ प्रवासाला जाणार आहे. हा प्रवास सुरु होताच ऑलीव्हर सर्वात कमी वयाचा, अंतराळ झेप घेणारा प्रवासी ठरणार आहे. बेजोस त्यांच्या अन्य चार साथीदारांसह २० जुलै रोजी व्यावसायिक अंतराळ प्रवासावर जाणार आहेत.

विशेष म्हणजे ब्लू ओरिजिन स्पेस शिपचे तिकीट लिलावात २.८ कोटी डॉलर्सना खरेदी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने वेळ नसल्याने या प्रवासात सहभागी होऊ शकत नाही असे पत्र दिले असून त्याचे पैसे परत मिळणार का याचा खुलासा झालेला नाही. त्यामुळे वेटिंग लिस्ट मध्ये असलेल्या ऑलीव्हर ला संधी मिळाली आहे असे समजते. यापूर्वी सोवियत संघाच्या के तीतोव याने युरी गागारीन नंतर चार महिन्यांनी अंतराळात झेप घेतली होती. त्यावेळी तो २५ वर्षाचा होता आणि लहान वयाचा अंतराळवीर अशी त्याच्या नावाची नोंद झाली होती.

ऑलीव्हर खासगी इक्विटी फर्म सीईओ जोस डाएमन यांचा मुलगा असून त्या दोघांनीही अमेरिकेत अंतराळात जाण्यासाठीचे प्रशिक्षण घेतले आहे. ऑलीव्हरने गतवर्षी शालेय शिक्षण संपल्यावर पायलटचे प्रशिक्षण घेतले आहे. बेजोस यांचा हा अंतराळ प्रवास १० मिनिटांचा असून अन्य प्रवाशात त्यांचे बंधू मार्क आणि १९६० च्या नासाच्या मर्क्युरी ७ मिशन साठी निवड झालेली पण त्यावेळी अंतराळात मिशन रद्द झाल्याने जाऊ न शकलेली ८२ वर्षीय वॉली फंक यांचा समावेश आहे.