इंग्लंड दौऱ्यावर कोरोनाचे सावट, टीम इंडियाच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण


नवी दिल्ली : सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियावर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. एका भारतीय खेळाडूचा कसोटी मालिकेपूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. अशातच कोरोनाची लागण झालेल्या भारतीय खेळाडूचे नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील एका सिनिअर खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. अशातच खेळाडूला क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच खेळाडूच्या संपर्कात आल्यामुळे इतर खेळाडूंनाही क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

याबाबत इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो खेळाडू सध्या होम क्वॉरंटाईन आहे. काही दिवसांनी हा खेळाडू डरहम कॅम्पसोबत जोडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून खेळाडूच्या घशात वेदना होत होत्या. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या खेळाडूचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

सध्या तीन दिवसांसाठी कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे खेळाडू संघातील इतर खेळाडूंसोबत जोडले जाणार आहेत. बीसीसीआयचे या संपूर्ण प्रकरणावर लक्ष असून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.