पुणे जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १३ लाख ३२ हजार रुपयांची मदत


मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाशी संलग्न असणाऱ्या पुणे जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने 13 लाख 32 हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केला. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

येथील संह्याद्री अतिथीगृहात संघटनेच्या वतीने हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा काळभोर, पुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे, राज्य संघटक नवनाथ धुमाळ, चिंतामण मोरे, हनुमंत हंडाळ, अरुण पाटील-बोडके, संपतराव जाधव, सोमनाथ मुळाणे, नीलकंठ थोरात, दिनेश पाटील, तृप्ती मांडेकर, रोहिणी हांडे, मोनिका कचरे, प्रविणा शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व पोलीस पाटलांनी कोविड काळात गावपातळीवर दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. या संकट काळात कर्तव्य बजावण्याबरोबरच गावकामगार पोलीस पाटील संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देण्याची संवेदनशीलता दाखविली आहे, ती कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.