कोविड लसीचा तिसरा डोस देणारा इस्रायल, जगातला पहिला देश

इस्रायल कोविड १९ लसीकरणाचा तिसरा डोस देणारा जगातील पहिला देश बनला आहे. सोमवारी देशातील ज्येष्ठ नागरिकांना फायझर बायोएनटेक लसीचा तिसरा डोस देण्याची मोहीम सुरु झाली आहे. देशात करोना डेल्टा व्हेरीयंट संक्रमितांच्या केसेस मध्ये वाढ होऊ लागल्याने तिसरा डोस देण्याचा निर्णय सरकारने घेतला असे समजते.

न्युयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार इस्रायल आरोग्य मंत्रालयाने ज्या नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांना तिसरा डोस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय हृदय विकार, फुफ्फुसरोग, कॅन्सर किंवा ज्यांनी मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत त्या सर्वाना तिसरा डोस देण्यात येणार आहे. शेबा मेडिकल सेंटरमधील तज्ञ प्रो. गालिया राहव यांनी सरकारचा हा निर्णय अतिशय योग्य असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले करोना लसीवरील आमचा रिसर्च सतत सुरु आहे.

१ महिन्यापूर्वी करोना डेल्टा व्हेरीयंटचे दररोज सरासरी १० रुग्ण होते ती संख्या आता ४५२ वर गेली आहे. ८१ रुग्णांवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे यातील ५८ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. इस्रायल मध्ये लसीकरण अतिशय वेगाने सुरु आहे. तिसऱ्या डोस मुळे कोविड १९ च्या बीटा व्हेरीयंट पासून चांगली सुरक्षा मिळेल अशी अपेक्षा आहे.

करोनाचा बीटा व्हेरीयंट सर्वप्रथम द. आफ्रिकेत सापडला होता. करोनाचे सध्या जेवढे व्हेरीयंट आहेत त्यात हा सर्वात शक्तिशाली असून डेल्टा पेक्षा सुद्धा तो अधिक घातक आहे असे समजते.