स्वतःचा सूर्य बनवून जगाला धक्का देणाऱ्या चीनने आता अंतराळातून म्हणजे स्पेस मधून आणलेल्या अन्नधान्याची शेती सुरु केली असून त्या अंतर्गत भाताचे पिक घेतले जात आहे. या तांदळाला स्पेस राईस असे नाव दिले असून स्थानिक त्याला स्वर्गीय तांदूळ म्हणत आहेत. या प्रकारे पेरल्या गेलेल्या साळीचे पहिले पिक कापणी झाले असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चांद्रयानासोबत भाताचे बियाणे म्हणजे साळ अंतराळात पाठविले गेले होते. ४० ग्राम वजनाच्या १५०० साळी अंतराळात काही काळ ठेऊन परत पृथ्वीवर आणल्या गेल्या आणि द.चीन कृषी विद्यापीठ परिसरात त्याची पेरणी केली गेली होती. त्याची कापणी भात रोपे तयार झाल्यावर केली गेली आहे. हे बियाणे अंतराळात काही काळ शून्य गुरुत्वाकर्षण परिस्थितीत ठेवले गेले आणि मग परत पृथ्वीवर आणले गेले.
ग्वांगडोंग येथील अंतरीक्ष प्रजनन अनुसंधान केंद्रात याची लागवड झाली. या साळीना १ सेंटीमीटर लांबीचे कोंब आले असून यापासून उत्तम दर्जाचे बियाणे प्रयोगशाळेत तयार करून मग शेतात त्याची लागवड केली जाणार आहे. अंतराळात राहिल्याने बियाणांच्यात परिवर्तन होते आणि अशा बियाणांपासून अधिक उत्पादन मिळते असे दिसून आले आहे. चीन अन्य पिकांवर सुद्धा असे प्रयोग करत आहे. त्याची सुरवात १९८७ मध्ये तांदूळ व अन्य बियाणी अंतराळात पाठवून केली गेली होती.
ब्लूमबर्गच्या रिपोर्ट प्रमाणे चीनने सुमारे २०० प्रकारच्या बियाणांवर असे प्रयोग केले असून त्यात कापूस, टोमॅटो, यांचाही समावेश आहे. २०१८ मध्ये चीन ने २४ लाख हेक्टरवर अंतराळात ठेऊन आणलेल्या बियाणांचा वापर केला आहे. हा स्वर्गीय तांदूळ आणखी ३ -४ वर्षात बाजारात येईल असेही सांगितले जात आहे.