रोजच्या भाजी प्रकारात आपण अनेकदा फ्लॉवर वापरतो. कॉलीफ्लॉवर असे त्याचे नाव. कोबी, ब्रोकोली जातीमध्ये हा प्रकार येतो. आपल्याकडे नाही पण परदेशात एक विशेष प्रकारचा फ्लॉवर मिळतो. त्याची फुले पिरामिड आकाराची असतात. रोमनेस्को फ्लॉवर असे या भाजीचे नाव आहे. गेले अनेक वर्षे वैज्ञानिक या फ्लॉवरची फुले अशी त्रिकोणी पिरामिड आकारात का असावीत यावर संशोधन करत होते. त्याचे रहस्य आता उलगडले आहे.
जगात हा फ्लॉवरचा एक अनोखा प्रकार असून तो अतिशय चविष्ट, आरोग्याला फायदेशीर आहे. अर्थात त्याची किंमत सुद्धा तशीच छान असून हा फ्लॉवर किलोला साधारण २२०० रुपये किमतीने विकला जातो. दिसायला सुद्धा हा फ्लॉवर अतिशय आकर्षक आहे.
फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटीफिक रिसर्च मधील वैज्ञानिक फ्रास्वा पर्सी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनात रोमनेस्को फ्लॉवरची फुले ही प्रत्यक्षात कळ्या असल्याचे दिसून आले. या कळ्या फुलण्याचा प्रयत्न करतात पण फुलू शकत नाहीत. मग पुन्हा त्यातून नवीन कोंब येतात आणि नव्या कळ्या होतात. या कळ्याही फुलू शकत नाहीत आणि त्यातून त्रिकोणी आकाराचा पिरामिड सारखा आकार तयार होतो. यात प्रत्येक कळी स्वतंत्र दिसते. नेहमीच्या फ्लॉवर किंवा ब्रोकोली मध्ये मात्र फुले दिसतात.
रोमनेस्को फ्लॉवरचा स्वाद शेंगदाण्यासारखा असतो आणि तो शिजवला की अधिक स्वादिष्ट होतो. यात जीवनसत्व के, सी सह हाय फायबर व कॅरॉटीनॉईडस भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी हा फायदेकारक आहे. तो रोस्ट करून किंवा सलाड मध्ये वापरला जातो. इटली मध्ये सापडलेल्या १६ व्या शतकातील प्राचीन कागदपत्रात याचा उल्लेख आढळला आहे. अमेरिका युरोप मध्ये याची शेती केली जाते आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारे हे पिक आहे.