अमेरिकेने बनविला उडणारा ग्रेनेड
अमेरिकेच्या लष्करने उडणाऱ्या ग्रेनेडच्या फिल्ड चाचण्या नुकत्याच पूर्ण केल्या आहेत. हेलीकॉप्टरच्या पंखाप्रमाणे असलेल्या पंखांच्या मदतीने हे ग्रेनेड २० किमी पर्यंत उडून शत्रूचे मोठे नुकसान करण्यास सक्षम आहेत असे समजते. आजपर्यंत सर्वसामान्यपणे शत्रूवर ग्रेनेड मारा करताना सैनिक ग्रेनेडची पिन काढून हातानेच तो दुरवर फेकतात आणि काही सेकंदात ग्रेनेड फुटतो व आसपासच्या प्रदेशाचे नुकसान करू शकतो. आता हे नवे ग्रेनेड भविष्यातील युद्धांचा भूगोल बदलू शकतील.
यात ग्रेनेडच्या वरच्या भागात चार रोटर ब्लेड आहेत. सैनिक हा ग्रेनेड हातात पकडून रोटरना फिरवू शकतात. पूर्ण स्पीडने रोटर फिरू लागली की हवेत हा ग्रेनेड फेकायचा. हा ग्रेनेड रिमोटने कंट्रोल करता येतो. नेमून दिलेले लक्ष्य ग्रेनेडला मिळाले नाही तर तो जेथून फेकला गेला तेथेच परत येतो. मग जाळीच्या मदतीने तो पकडून पुन्हा त्याचा हवा तेव्हा वापर करता येतो असे समजते.
अमेरिकेच्या कॅरोलिना कॅम्प वर या ग्रेनेडच्या टेस्ट ७ जुलै रोजी केल्या गेल्या. विशेष म्हणजे या ग्रेनेडचा ट्रिगर सुद्धा रिमोटने कंट्रोल होतो. हे ग्रेनेड म्हणजे ड्रोन ४० मोड्युलर क्वाडकॉप्टरचाच एक प्रकार आहे. म्हणजे एकदा फुटून त्याचा स्फोट झाला की तो नष्ट होतो पण मुळातच हा ग्रेनेड बनायला कमी खर्च येत असल्याचे आर्थिक दृष्ट्या ते परवडते असे सांगितले जाते. अन्य फायदा म्हणजे ग्रेनेड ऐवजी याचा वापर हेरगिरी, देखरेख, टोहो मिशनसाठी करता येतो त्यासाठी त्याला आयएसआर पेलोड लावता येतात.