सातवा वेतन आयोग; केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावरील निर्बंध हटवले


नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कोरोना काळात रोखण्यात आला होता. या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावरील निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. कोरोनाची सुरुवात मागील वर्षी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ते रोखले होते. महागाई भत्त्याच्या तीन हफ्त्यांवर, हे निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवण्याचा निर्णय आता घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना काळात बंद केलेला महागाई भत्ता आता वाढवून मिळणार असल्यामुळे केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत आज निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार गेल्या वर्षी 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या तीन हफ्त्यांवरील निर्बंध हटवले आहेत. हे निर्बंध आता हटल्यानंतर तीन हफ्त्यात एकूण 11 टक्के वाढ होणार आहे. म्हणजे महागाई भत्त्याच्या सध्याच्या 17 टक्क्यांमध्ये वाढ होऊन, ती 28 टक्के होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारी लोकांना केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाभ होणार आहे. देशात कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवरील वाढता ताण पाहता महागाई भत्ते वाढवण्यावर निर्बंध आणले होते. मागील वर्षी कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर एप्रिल महिन्यात केंद्रीय कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता दोन हफ्त्यात देण्यावर बंदी आणली होती. महागाई भत्त्याचे हफ्ते प्रत्येक सहा महिन्याला दिले जातात. 1 जानेवारीला एक तर दुसरा 1 जुलैला हा हफ्ता सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो.