राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे


मुंबई – भलेही देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी इंडियन मेडिकल असोसिएशनने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर कमी आहे. असे असले तरी कोरोनाचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केल्यामुळे व्यापारी आणि प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे.

त्यांनी यावेळी दुकाने आणि प्रवासाच्या नियमात कोणतेही बदल नसतील, असे स्पष्ट केले आहे. आमचा भर राज्यात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. जास्तीत जास्त लसी या केंद्र सरकारकडून मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचे राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऑगस्ट महिन्यात ४ कोटी लसी उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या राज्यात होणारा लसींचा पुरवठा हा कमी असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर विना राज्यात प्रवेश देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

त्याचबरोबर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढवण्यात आले आहे. मंत्रिमंडळाने सेवा निवृत्तीचे वय वाढवण्यास कार्योत्तर मान्यता दिली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांची रिक्त जागा भरण्यासाठी पावले उचलली जात असून हा निर्णय तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.