केरळमधील 23 जणांना झिका व्हायरसची लागण, अलर्ट जारी


नवी दिल्ली : कोरोना संसर्गानंतर आता केरळमध्ये झिका व्हायरसचाही प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. केरळमध्ये याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच दिल्लीहून तत्काळ तज्ज्ञांचे एक विशेष पथक केरळसाठी रवाना झाले होते. केरळचे आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितले की, झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये आणखी चार नवे झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आल्यामुळे केरळमध्ये सध्या 23 रुग्णांना झिका व्हायरसची लागण झाली आहे.

झिका व्हायरसचा प्रादुर्भाव केरळमध्ये वाढत आहे. अशातच केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी राज्यात अलर्ट जारी केला आहे. तसेच झिका व्हायरससोबत केरळमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भावही वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच डासामुळे हे आजार होतात. केरळ दौऱ्यावर असलेल्या दिल्ली एम्सच्या पथकाने झिका व्हायरसबाबत देशातील इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर आता दिल्ली आणि मुंबईसह देशातील अनेक मोठ्या शहरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळच्या शेजारील राज्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळमध्ये गुरुवारी डास चावल्यामुळे होणाऱ्या या आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला होता. परंतु, 48 तासांनी या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून आली. या व्हायरसने राज्यांसोबत केंद्र सरकारच्याही चिंतेत भर पडली आहे. एका गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले होते. परंतु, शुक्रवारी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने आणखी 13 नमुन्यांची चाचणी केली होती. त्यानंतर या 13 व्यक्तिंनाही झिका व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. सुरुवातीला 14 रुग्णांना झिका व्हायरसची लागण झाली होती. आता हा आकडा 23 वर पोहोचला आहे.