मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर अदानी बनले सर्वात मोठे एअरपोर्ट ऑपरेटर

गौतम अदानी ग्रुपने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन हाती घेतल्याची माहिती कंपनीने सोशल मिडिया ट्विटर वरून दिली आहे. यामुळे अदानी देशातील सर्वात बडे विमानतळ ऑपरेटर बनले आहेत. अदानी लिहितात,’ वर्ल्डक्लास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन टेक ओव्हर केल्याचा आनंद आहे. मुंबई विमानतळाबाबत अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याचा वादा आहे आणि यात आम्ही यशस्वी होऊ.’

यापूर्वी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने बंगलोर, लखनौ, अहमदाबाद या विमानतळांचे व्यवस्थापन, विकास हाती घेतला असून जुलै अखेर जयपूर, गोहाटी, तिरुवनंतपुरम विमानतळांचे अधिग्रहण केले जात आहे. या विमानतळाचा सहा वर्षात विकास होणार आहे आणि त्यांचे परिचालन ५० वर्षांसाठी अदानी ग्रुप कडे राहणार आहे.

मुंबई विमानतळासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सने २३.५ टक्के हिस्सेदारी खरेदी केली असून त्यासाठी १६८५.२५ कोटी रुपये मोजले आहेत. दोन विदेशी कंपन्या एसीएसअ ग्लोबल आणि एसीएसए( बीडवेस्ट) मॉरीशस यांच्या कडून ही हिस्सेदारी खरेदी केली गेली आहे. याच बरोबर जीव्हीके ग्रुप कडून ५०.५ टक्के हिस्सेदारी खरेदी करून त्यासोबत नवी मुंबई विमानतळ विकसित करण्याचा अधिकार मिळविला आहे असे समजते.