मोदींचा पीव्ही सिंधू बरोबर आईस्क्रीम खाण्याचा  वादा

२३ जुलै पासून टोक्यो येथे सुरु होत असलेल्या ऑलिम्पिक साठी भारतातून १२६ खेळाडूंचे पथक रवाना होत असून या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी काही निवडक खेळाडू आणि त्याच्या आई वडिलांशी व्हर्च्युअल संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशाच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत पण या अपेक्षेचे ओझे न बनविता त्या तुमच्या विजयाचा आधार बनवा असा संदेश देताना मोदी यांनी सर्व देश तुम्हाला चिअर करण्यासाठी तुमच्या बरोबर आहे असे सांगितले.

मोदींनी काही खेळाडूंच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंगांचा उल्लेख करताना बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला टोक्यो वरून परत आल्यावर बरोबरच आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ असे आश्वासन दिले. सिंधूने रिओ ऑलिम्पिक मध्ये रजत पदकाची कमाई केली होती. पण त्या अगोदर प्रशिक्षक गोपीचंद यांनी सिंधूचे आईस्क्रीम खाणे बंद केले होते, त्याचा या विधानाला संदर्भ होता.

मुष्टीयोद्धा मेरी कोम हिला तुमचा आवडता बॉक्सर कोण असे मोदींनी विचारेले तेव्हा तिने टायसन असे उत्तर दिले. मोदी खेळाडूंशी संवाद साधताना म्हणाले, करोनाने खूप बदल झाला आहे. तुमच्या स्पर्धा तयारीवर सुद्धा त्याचा परिणाम झाला आहे. टोक्यो मध्ये आणखी वेगळे वातावरण आहे. पण तुमच्याशी झालेल्या गप्पातून तुमची तयारी आणि मेहनत समजते आहे. तुम्ही सर्व जण धीट, आत्मविश्वासू आणि सकारात्मक आहात. शिस्त, डेडिकेशन आणि डीटरमिनेशन तुमच्यात दिसते आहे.

तुम्ही कसून मेहनत घेतली आहे, घाम गाळला आहे. देशाचा ध्वज तुम्ही बरोबर नेत आहात. तेव्हा तुमच्या सोबत उभे राहणे ही देशाची जबाबदारी आहे. १३५ कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत असेही मोदी म्हणाले.