अंतराळ सफरीचा पाया घालणाऱ्या व्हर्जिनचे असे आहे हे खास विमान

ब्रिटनचे अब्जाधीश रिचर्ड ब्रान्सन यांची व्हर्जिन गॅलेटिक ही अंतराळात व्यावसायिक उड्डाण करणारी पहिली कंपनी बनली आहे आणि त्यामुळे आता स्पेस टुरिझमचा नवा अध्याय सुरु झाला आहे. व्हर्जिन गॅलेटिक कंपनीचे अंतराळ सफर घडविणारे हे विमान आहे तरी कसे याची अनेकांना उत्सुकता आहे. व्हीएसएस युनिटी असे या विमानाचे नाव असून हे नाव प्रसिध्द अंतराळ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनी दिले आहे.

व्हर्जिनचा अंतराळ प्रोजेक्ट २०१२ मध्ये सुरु झाला होता आणि त्यांच्या पहिल्या एंटरप्राइज स्पेसशिपने २०१४ मध्ये अवकाशात झेप घेतली पण हे उड्डाण स्पेस शिप क्रॅश झाल्याने अयशस्वी ठरले होते. त्यानंतर युनिटीवर काम सुरु झाले आणि २०१६ मध्ये त्याची यशस्वी चाचणी झाली. या विमानाचे डिझाईन आणि आकार एकदम वेगळा होता. २०१८ मध्ये युनिटीने प्रथम कंप्लीट सबअर्बिटल उड्डाण केले. त्यावेळी हे विमान पृथ्वीपासून ८० किमी वर अंतराळात जाऊन पोहोचले होते. नासाने ८० किमी ही अधिकृत सीमा म्हणून निश्चित केली आहे.

वास्तविक पृथ्वी वायुमंडळाच्या ५४ किमी वर गेल्यावर अंतराळ सुरु होते. यासाठी बनविल्या गेलेल्या विमानाला ३६० अंशात फिरू शकतील अश्या सीटस आहेत. त्यामुळे व्यक्ती चहुबाजूने अंतराळाचा रोमांच अनुभवू शकते. डावी उजवीकडे, खाली वर अश्या सर्वत्र खिडक्या आहेत. १२ प्रवासी सीट असलेल्या या विमानात केबिन्स सुद्धा आहेत. भारहीन अवस्थेत सहज उठणे, बसणे किंवा केबिन मध्ये जाता येते. आत १६ कॅमेरे आहेत. त्याच्या सहाय्याने व्यक्ती रिसर्च करू शकते.

विमानाच्या सीट डिझाईन करताना खुपच डोकेफोड केली गेल्याचे सांगितले जाते. ग्रॅव्हीटेशनल फोर्स व फ्लोट झोनचा विचार करून त्याचे डिझाईन केले गेले आहे. अल्युमिनियम व कार्बन फायबर पासून या सीट बनविल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे या विमानात प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी सुद्धा १ केबिन दिली गेली आहे.