मुंबई – कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी केली असल्याचे राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणामधून स्पष्ट झाले आहे. मुलांना शाळेत पाठवण्यास आम्ही तयार असल्याचे मत ८१.१८ टक्के पालकांनी व्यक्त केले आहे. या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रामधील ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ५ लाख ६० हजार ८१८ पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६ लाख ९० हजार ८२० पालकांपैकी ३ लाख ५ हजार २४८ पालक ग्रामीण भागातील, ७१ हजार ९०४ पालक निमशहरी भागातील आणि ३ लाख १३ हजार ६६८ पालक शहरी भागात रहाणारे आहेत.
सर्वेक्षण; राज्यातील एवढे टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार
या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पालकांपैकी सर्वाधिक म्हणजे ७३ हजार ८३८ पालक हे पुण्यातील होते. तसेच यामध्ये मुंबई मनपा क्षेत्रातील ७० हजार ८४२ पालकांनी आपला प्रतिसाद नोंदवला. त्याप्रमाणे यामध्ये कोल्हापूरमधील ३० हजारहून अधिक, नाशिकमधील ४७ हजारांहून अधिक, साताऱ्यातील ४१ हजारांहून अधिक, ठाण्यातील ३९ हजारांहून अधिक पालकांनी आपला सहभाग नोंदवला.
सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पालकांपैकी २.८९ टक्के पालकांची मुले ही नर्सरीमध्ये आहेत. तर पहिली ते पाचवीला पाल्य असणाऱ्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांची संख्या २३.४८ टक्के एवढी आहे. सहावी ते आठवीला पाल्य असणाऱ्या ३१.२१ टक्के पालकांनी या सर्वेक्षणात मत नोंदवले. सर्वाधिक ४१.५४ टक्के पालक हे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे होते. तसेच ११ वी आणि १२ वीला पाल्य असणाऱ्या पालकांची १५.२६ टक्के एवढी होती. या सर्वेक्षणामधील आकडेवारीवरुन मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भातील तयारी पालकांनी केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.