मुंबई – दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. नाना पटोले यांनी लोणावळ्यातील सभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटले होते. पण, या वक्तव्यावरून विरोधकांच्या टीकेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून देखील तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर आता नाना पटोले यांनी आपल्या त्या वक्तव्यावर सारवासारव करत खुलासा केला आहे. माझे ते वक्तव्य माध्यमांनीच वाढवून सांगितले, अशा गोष्टी होत असतात असा खुलासा नाना पटोले यांनी केल्यामुळे या मुद्द्यावरून आता नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होण्याची शक्यता आहे.
माझे ‘ते’ वक्तव्य माध्यमांनीच वाढवून सांगितले; नाना पटोलेंचा खुलासा
नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडताना सर्वच गोष्टींविषयी केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष असल्याचे सांगितले. राज्य आणि केंद्र सरकारचे माध्यमांवर देखील लक्ष असते. आपण जे काही बोलतो, त्यावर देखील त्यांचे लक्ष असतेच. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर लक्ष ठेवतात, असे माध्यमांनी वाढवून सांगितले. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत आहे. राज्याच्या विकासाचे आमचे धोरण आहे. हे सरकार त्या आधारावर चालत आहे. काँग्रेसच्या महागाईविरोधातील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ३ दिवसांपूर्वीच्या एका भाषणातील क्लिप काढून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असे कितीही कटकारस्थान आमच्याबद्दल केले, तरी काँग्रेस जनतेचे प्रश्न मांडत राहणार असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, नाना पटोले यांनी यावेळी बोलताना मूळ मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. देशाला लुटायचा प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केला आहे. त्याला काँग्रेसकडून विरोध केला जाणार आहे. केंद्र सरकार रोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवत आहे. चीनचे सैन्य देशात घुसले आहे, त्याबाबत देखील भाजप काही उत्तर देत नाही. या सगळ्या विषयांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात काँग्रेस नेत्यांमध्ये गोंधळ असल्याचे माध्यमांच्या माध्यमातून कुणी पेरत आहे, ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात बोलताना नाना पटोलेंना खोचक टोला लगावला आहे. नाना पटोलेंनी एकदाच नाही, तर अनेक वेळा तलवार म्यान केली आहे. रोज मरे, त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झाली आहे. कदाचित त्यांच्या भावना खऱ्या असतील. त्यामुळे त्यांनी त्या ताकदीने मांडल्या. पण नंतर अजित पवारांची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असणार, असे प्रविण दरेकर म्हणाले आहेत.