भारताच्या आठवणीत भावूक झाले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई


कॅलिफोर्निया – कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीमधील गूगल हेडक्वार्टरमध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तामिळनाडूमध्ये जन्मलेले आणि चेन्नईमध्ये वाढलेले गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी माझ्यामध्ये भारताची मुळे खोलवर रुतली असून मी आज जे काही आहे, त्यामध्ये भारताचा मोठा भाग असल्याचे आहे. त्याचबरोबर मोफत आणि मुक्त इंटरनेटच्या धोक्यांसह अनेक विषयांवर पिचाई यांनी भाष्य केले.

त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल ४९ वर्षीय पिचाई यांना विचारले असता ते म्हणाले, मी एक अमेरिकन नागरिक आहे, परंतु माझ्या मनात भारतच आहे. माझी मुळे भारतातच रोवली असल्यामुळे मी आता जे काही आहे याचा भारत एक मोठा भाग आहे. पिचाई कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) बोलताना म्हणाले, मला कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वात शक्तिशाली तंत्रज्ञान म्हणून दिसते आहे, ज्याला मानव विकसित करेल आणि त्यावर काम करेल. जर आपण आग किंवा वीज किंवा इंटरनेटबद्दल विचार करत असाल, तर कृत्रिम बुद्धिमत्ताही तशीच आहे.

सर्व्हेलंसवर आधारित इंटरनेटचे चीनी मॉडेल वाढत आहे का? असा प्रश्न यावेळी पिचाई यांना विचारण्यात आला. त्यावर फ्री आणि ओपन इंटरनेटवर हल्ला होत असल्याचे पिचाई यांनी म्हटले. तसेच ते थेट चीनचा संदर्भ न घेता म्हणाले, आमची कोणतीही उत्पादने आणि सेवा चीनमध्ये उपलब्ध नाहीत. पिचाई कराच्या वादग्रस्त विषयावर म्हणाले की, जगातील सर्वात मोठे करदात्यांपैकी आम्ही एक आहोत, गेल्या दशकभरातील जर कराच्या सरासरीकडे पाहिले तर आम्ही २० टक्क्यांहून अधिक कर भरला आहे. पिचाई पुढे म्हणाले, अमेरिका जिथे आमची उत्पादने विकसित केली जातात, तेथे आपला बहुतांश कर आम्ही भरतो. या व्यतिरिक्त, जेव्हा पिचाईंना त्यांच्या वैयक्तिक तंत्रज्ञानाच्या सवयीबद्दल विचारले गेले, तेव्हा त्यांनी सर्वांना टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापर करण्याचा सल्ला दिला.