सहा केसांना लिलावात मिळाली १० लाखाची किंमत
दररोज कोणत्या ना कोणत्या वस्तूंचे लिलाव सुरूच असतात. नामवंत लिलाव कंपन्या दुर्मिळ वस्तूंचे लिलाव करतात आणि त्या कोट्यवधी रुपयांना विकल्या गेल्याचे आपण ऐकतो. पण लिलावात फक्त सहा केसांना १० लाखची(१४१४५ डॉलर्स) बोली लागल्याचे काही नेहमी ऐकिवात येत नाही. अर्थात हे केस कुण्या ऐऱ्यागैऱ्याचे नव्हते. हे केस होते प्रभावशाली रॉकस्टार कर्ट कोबेन याचे.
पाश्चात्य देशात रॉक स्टार्सचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. आपल्या आवडत्या रॉक स्टारची एक झलक पाहायला मिळावी यासाठी हे चाहते वाटेल ते करायला तयार असतात. त्यामुळे रॉक स्टार्स नी वापरलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित वस्तू लाखो करोडो मध्ये विकल्या जातात. अमेरिकेतील रॉकस्टार कर्ट सुद्धा त्याला अपवाद नाही. सिंगर, गिटारिस्ट, निर्वाणा बँडचा प्रमुख असलेल्या कर्टने वयाच्या २७ व्या वर्षी आत्महत्या केली होती. मात्र आजही त्याचे चाहते लाखोंच्या संख्येने आहेत. एका खास लिलावात कर्टच्या सहा केसांसाठी वरील रक्कम मोजली गेली.
अनेक वर्षे हे केस प्लास्टिक मध्ये जतन केले गेले होते. निर्वाणाचा पहिला अल्बम रिलीज झाला आणि त्यानंतर कर्टने चार महिन्यांनी केस कापले होते. हा अल्बम सुपरहिट झाला आणि कर्ट रातोरात स्टार झाला. त्यानंतर त्याची प्रत्येक वस्तू ब्रांड म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याच्या एक मित्राने ऑक्टोबर १९८९ मध्ये इंग्लंड मध्ये कर्टचे केस कापून दिले होते त्यातील हे केस आहेत.
यापूर्वी जून मध्ये कर्टचे गिटार लिलावात विकले गेले आहे. त्याला १० ते वीस लाख डॉलर्स किंमत मिळेल असा अंदाज होता पण प्रत्यक्षात ते ६० लाख डॉलर्सना विकले गेले होते. जगातील हे सर्वात महाग गिटार ठरले. कर्टच्या इन्शुरन्स लेटरचा सुद्धा लिलाव झाला होता. या लेटरवर कर्टची सही होती. हे लेटर १३ लाखाला विकले गेले होते.