ऑईल रेसलिंग – तुर्कस्थानचा राष्ट्रीय खेळ

भारताप्रमाणे अनेक देशात कुस्ती लोकप्रिय आहे. कुस्त्यांचे फड महाराष्ट्रात लागतात तसेच हरियाना पंजाब मध्येही लागतात. अनेक भारतीय पहिलवान परदेशात जाऊन कुस्ती पदके मिळवितात. तुर्कस्थान मध्ये सुद्धा एक विशेष प्रकारची कुस्ती अतिशय लोकप्रिय असून दरवर्षी त्याच्या स्पर्धा होतात. ऑइल रेसलिंग असे या कुस्तीला म्हटले जाते आणि या कुस्तीची सुरवात १३ व्या शतकात झाली असे सांगतात. ही कुस्ती तुर्कस्थानचा राष्ट्रीय खेळ आहे.

या वर्षी या कुस्तीचा ६६० वा वर्षापन दिवस होता. त्यानिमित्त झालेल्या स्पर्धेत २१६० पहिलवान सहभागी झाले होते. या कुस्तीचे विशेष म्हणजे यात सहभागी होणाऱ्या पहिलवानाला १३ किलो वजनाची चामड्याची पँट घालवी लागते आणि तेल किंवा ग्रीसने अंघोळ करावी लागते. जून अखेरी किंवा जुलैच्या सुरवातीला या कुस्तीचे फड रंगतात. त्यासाठी पहिलवान महिनोन महिने तयारी करतात. वयाची किमान अट १५ असते. स्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टर टीम तैनात केलेली असते.

हजारो लोक या कुस्तीचा आनंद घेण्यासाठी जमतात. हा खेळ देशाला समर्पित असून लष्कराचा हौसला बुलंद करण्यासाठी दरवर्षी या स्पर्धा होतात. दरवर्षी विजेत्याला गोल्डन बेल्ट दिला जातो. कुस्ती सुरु झाली की ४० मिनिटाचा वेळ असतो पण त्यात विजेता ठरला नाही तर १५ मिनिटे वाढवून दिली जातात. १९७५ पासून हा वेळ ३० मिनिटे आणि वाढीव १० मिनिटे केला गेला आहे. यंदा ३ दिवस चाललेल्या या दंगलीत अली गुरबेज विजयी झाला आहे. त्याचा हा विजय सलग दुसरा विजय आहे.

विशेष म्हणजे ऐतिहासिक पुरावे आणि या कुस्तीची प्रसिद्धी पाहून युनेस्कोने २०१० मध्ये या कुस्तीचा समावेश सांस्कृतिक वारसा यादीत केला आहे.