राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका


अकोला – महाराष्ट्रात शिवव्याख्याते म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्या झटका आला होता. त्यांना हिंगणा येथील एका कार्यक्रमात बोलताना अचानक आपली प्रकृती बिघडल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर त्यांना येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी आता एक व्हिडिओ करत आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले आहे.

एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते आणि शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांनी जारी केला. त्यामध्ये ते म्हणाले, की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी मी ठणठणीत आहे. सध्या कोरोनाच्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मी आयकॉन हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. कुणीही भेटायला येण्याची कृपा करू नका. याचे कारण, मला माझ्या आरोग्याची जेवढी काळजी आहे, त्यापेक्षा अधिक तुमची काळजी आहे. त्यामुळे मी आवाहन करतो की तुमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा, सद्भावना शेवटपर्यंत माझ्या पाठीशी आहेत. याच शुभेच्छांच्या बळावर मी सर्व संकटांवर मात करत पुढे जाणार आहे. फक्त तुम्ही येथे येऊन स्वतःचे जीव धोक्यात घालू नये. परवा (14 जुलै) रोजी मला डिस्चार्ज मिळणार आहे. धन्यवाद…!

राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा अकोल्यात दौरा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बिफार्म कॉलेजमध्ये या निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अमोल मिटकरी यांनी याच कार्यक्रमात बोलताना मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावाकड राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली हे गाण्यास सुरुवात केली. याच्या काही क्षणातच त्यांचे तोंड किंचित वाकडे झाले. तेथील उपस्थितांना याची जाणीव होताच, त्यांनी तातडीने मिटकरी यांना रुग्णालयात दाखल केले.