मी खडसेंच्या सीडीची वाट बघत आहे : राज ठाकरे


पुणे : काल पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन झाले. राज ठाकरे उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, निवडणुकीच्या तयारीची सुरुवात या कार्यालयातून झाली का? तर हो झाली आहे. मनसेचे वातावरण आगामी निवडणुकांमध्ये चांगलेच असेल. सध्या माझे इंजिन मीच चालवत आहे. निवडणुकांमध्ये परिस्थितीनुसार एकला चलो रे अशी भूमिका राहील, असे राज ठाकरे म्हणाले.

ते आरक्षणाविषयी बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या वेळेला मुंबईला मोर्चा निघाला होता. त्यावेळी सगळेच नेते गेले होते. त्यावेळी सगळ्यांना मान्य होते, तर मग अडले कुठे. केंद्राच्या सरकारला मान्य आहे, राज्य सरकारला मान्य आहे. मग अडवले कुणी? न्यायालयात व्यवस्थित मांडल जात नाही का? फक्त माथी भडकवायची आहेत का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. ते म्हणाले की, सगळ्यांना एका व्यासपीठावर बसवा आणि विचारा. कोण कुणाचा शत्रू आहे हेच कळत नाही. समाजाचे प्रश्न आले की तोंड फिरवायचे. आता समाजाने विचारले पाहिजे. आरक्षण प्रकरणी राजकारण आहे का काय आहे, हे समाजाने बघितले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे विमानतळाच्या नामकरण प्रकरणी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत म्हणाले की, विमानतळ नाव प्रकरणी मी सर्व बोललो आहे. पुण्यात मी स्थायिक झालो, तर मी राज मोरे नाही होणार, राज ठाकरेच राहणार आहे. विमानतळ फक्त शिफ्ट होत आहे, तर नाव बदलण्याचा प्रश्नच येत नसल्याचे ते म्हणाले. ईडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, काँग्रेस असताना ही असाच गैरवापर झाला. भाजप असतानाही तोच वापर होत आहे. ईडीचा बाहुली म्हणून वापर करू नये. ज्यांनी खरे गुन्हे केले, ते गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. मी खडसेंच्या सीडीची वाट बघत असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे म्हणाले की, नारायण राणे मंत्री झाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केले होते, पण त्यांचे फोन बंद होते. त्यांच्या मुलाला पण फोन केला होता, असे ते म्हणाले.