दिग्विजय सिंह यांच्यासहित २०० जणांविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


भोपाळ – माजी मुख्यमंत्री आणि राज्य सभेचे खासदार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भोपाळमध्ये कोरोना कालावधीत आंदोलन करुन शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्विजय यांच्यासोबतच माजी मंत्री पीसी शर्मा, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कैलाश मिश्रांसहीत २०० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

कलम १८८, १४७ आणि २६९ अंतर्गत अशोक गार्डन पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये थेट माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासोबत पीसी शर्मा, काँग्रेस जिल्हा अध्यक्षांसोबतच १० लोकांच्या नावाचा उल्लेख आहे. तर आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी करणाऱ्या २०० अज्ञातांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या २०० जणांची ओळख व्हिडीओच्या माध्यमातून पटवली जात आहे. दिग्विजय सिंह हे गोविंदपुरा औद्योगिक परिसरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लघु उद्योग संस्था असणाऱ्या भारती संस्थेला १० हजार वर्ग फूट जमीन देण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत होते. गुन्हा दाखल केल्याची माहिती भोपाळच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी एएनआयशी बोलताना दिली.

यावेळी आंदोलकांना पोलिसांनी बॅरिकेट्स लावून अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दिग्विजय यांच्यासहीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्सवर चढण्याचा प्रयत्न केला, असता पोलिसांनी वॉटर कॅननच्या मदतीने आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. भोपाळमधील गोविंदपुरा इंडस्ट्रियल एरियामध्ये गोविंदपुरा इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्यासमोर १० हजार वर्ग फूट आकारमान असणारे एक पार्क आहे. दिग्विजय सिंह यांनी आरोप केला आहे की पार्कची जमीन सरकारने चुकीच्या पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारती या कंपनीला दिली आहे. या ठिकाणी भारतीचे कार्यालय उभारले जाणार असल्याचेही दिग्विजय सिंह म्हणाले आहेत. या ठिकाणी रविवारी भारती लघु उद्योग कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण दिग्विजय सिंह आणि त्यांचे सहकारी या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी गोविंदुपामध्ये पोहचले आणि तिथे त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली.

दिग्विजय सिंह यांचे आंदोलन हे वायफळ असल्याची टीका भारती लघु उद्योगच्या भूमिपूजनादरम्यान उपस्थित असणारे मध्य प्रदेशचे आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी केली. काँग्रेसला चांगल्या कामाचा त्रास होतो अशीही टीका विश्वास सारंग यांनी केली. भारती लघु उद्योगचे कार्यालय सर्व नियमांचे पालन करुन उभारले जात आहे. कर्मचारी प्रशिक्षण आणि इतर काम या ठिकाणी केली जातील, असेही मंत्र्यांनी सांगितले.