मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा आदेश


मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (सोमवार) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्सची स्थापन करावी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश दिले. कोरोनाकाळात देखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये, या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोना काळात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू राहिले हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला घालून द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले, तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोरोना प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती.

सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेसवाणी, अश्विन यार्दी, राशेष शहा, केशव मुरुगेश, भारत पुरी, असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, डी के सेन, सुलज्जा फिरोदिया मोटवाणी, शरद महिंद्रा, आदी उद्योगपती या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात आज सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. येणाऱ्या काळात कोरोनाचे आव्हान अधिक वाढले, तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे. उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे. छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोरोनापासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्या माध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले, तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्या दृष्टिने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

डेल्टाच्या नव्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून, अनेक देशांनी परत निर्बंध लावण्यास व काळजी घेण्यास सुरुवात केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आणखी काही महिने तरी आपल्याला मास्क नियमित वापरणे, हात सातत्याने धुत राहणे, सामाजिक अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे.

डॉ प्रदीप व्यास यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गेल्या वर्षी पहिल्या लाटेत २० लाख रुग्ण आढळले, तर दुसऱ्या लाटेत दोन तीन महिन्यातच ४० लाख रुग्ण आढळले. पुढील लाटेचा वेग कितीतरी पटीने जास्त असू शकतो. सद्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहेत. केंद्राकडून २५ टकके लसी खासगी रुग्णालयांना देण्याचे धोरण असून उद्योगांनी त्यांच्याशी बोलणी करून त्यांच्या कामगारांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे, असेही ते म्हणाले. उद्योगांच्या प्रतिनिधींनी देखील कोरोनाच्या या साथीत राज्य शासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे तसेच उद्योगांच्या परिसरात कोरोना सुसंगत वर्तणूक राहील याची काळजी घेण्याची खात्री दिली. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील यासंदर्भात उद्योगांशी समन्वय ठेवण्यात येत असल्याचे सांगितले.