पंकजा मुंडेंना भेटून उद्या 400 ते 500 मुंडे समर्थक घेणार मोठा निर्णय ?


मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला असून, गोपीनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांचा विसर या मंत्रिमंडळात मोदी सरकारला पडल्याचे पहायला मिळाले. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आल्यामुळे आता मुंडे समर्थक आक्रमक झाले असून, मुंडे सर्मथकांच्या राजीनाम्याचे सत्र जोरदार सुरु झाले आहे. उद्या तर 400 ते 500 मुंडे समर्थक पंकजा ताईंना भेटून मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या दिल्लीत पंकजा मुंडे असून, प्रितम मुंडे यांच्या भेटीगाठी कार्यकर्त्यांनी सुरु केल्या आहेत. तसेच उद्या पंकजा मुंडे दिल्लीतून आल्यानंतर हे कार्यकर्ते त्यांची भेट घेऊन मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून न घेतल्यामुळे नाराज मुंडे समर्थकांकडून भाजपमधील पदांचे राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असला तरी या राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. बीडमधील पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशा एकूण 36 जणांनी राजीनामा दिला आहे. तर आज 70 जण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.