वीज कोसळून एका दिवसात तब्बल 50 जणांचा मृत्यू, जयपूरमध्ये 20 तर उत्तर प्रदेशमध्ये 30 जणांनी गमवाला जीव


नवी दिल्ली : वीज कोसळून तब्बल 50 जणांचा राजस्थान आणि उत्तर प्रदेशात मृत्यू झाला आहे. राजस्थानातील जयपूरमध्ये आमेर महलाच्या टॉवरवर वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशात चित्रकूट, उन्नाव, प्रयागराज, फिरोजाबाज आणि कानपूर अशा वेगवेगळ्या ठिकणी वीज कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानातील घटना ही आजवरची सर्वात धक्कादायक घटना मानली जात आहे. अनेकजण मुसळधार पाऊस सुरु असताना सेल्फीसाठी टॉवरवर चढले होते. यावेळी टॉवरवर वीज कोसळली आणि सेल्फीसाठी टॉवरवर चढलेले लोक वीजेच्या धक्क्याने आजबाजूच्या जंगलात उडाले.

आमेर महलच्या टॉवरवर वीज कोसळून झालेल्या मृतांमध्ये तरुणांचा आकडा अधिक होता. किल्ल्याजवळच्या डोंगरावर हे तरुण वातावरणाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यांच्यापैकी काही लोक टॉवरवर सेल्फी घेत होते, तर काही लोक तिथेड डोंगरावर होते. याच टॉवरवर वीज कोसळली आणि ही दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळून घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, कोटा, धौलपूर, झालावाड, जयपूर आणि बारांमध्ये आज वीज कोसळल्यामुळे दुर्दैवी घटना घडली. पीडित कुटुंबियांबद्दल मी मनःपूर्वक शोक व्यक्त करतो, देव त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देईल. पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन राजस्थानमधील घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, राजस्थानमधील काही भागात वीज कोसळल्यामुळे अनेकांनी प्राण गमावले आहेत. यामुळे अति दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो.