कोरोनाबाधित वाढल्यामुळे महापालिकेने सील केली अभिनेता सुनिल शेट्टीची बिल्डिंग


मुंबई – मुंबईतील अल्टामाऊंट रोडवर असलेल्या पृथ्वी अपार्टमेंट्सची इमारत मुंबई महानगरपालिकेकडून सील करण्यात आली आहे. या इमारतीत बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याचे घरही आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ही इमारत सील करण्यात आली आहे.

नियमानुसार एखाद्या इमारतीत ५ किंवा पाच पेक्षा जास्त कोरोनाबाधित सापडले, तर ती सील करण्यात येते. सुनिल शेट्टी आणि त्यांचे कुटुंबीय सध्या मुंबईबाहेर आहेत. या बिल्डिंगमध्ये 30 मजले आणि 120 फ्लॅट्स आहेत. याबाबतची माहिती मुंबईच्या डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे. पृथ्वी अपार्टमेंट सील करण्यात आली असून या भागात सध्या अशा १० इमारती सील आहेत. यामध्ये मलबार हिल्स आणि पेडर रोड वरील इमारतींचा देखील समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उंचावरील जागांवर 80 टक्के रुग्ण आढळले होते.

सुनिल शेट्टीच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, सुनिल शेट्टी आणि त्यांचे कुटुंबीय हे सध्या मुंबईबाहेर आहेत. सुनिल शेट्टी हे या बिल्डिंगमध्ये राहतात. इमारतीत सापडलेल्या कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने सावधगिरी म्हणून बिल्डिंगचे काही मजले सील केले आहेत. मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. ही संख्या काही काळापुरते कमी झाली होती. देशात महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा चिंता वाढविली आहे.