ब्रान्सनसोबत अंतराळात झेप घेणारी शिरीशा ठरली ४ थी भारतवंशी

न्यू मेक्सिको मध्ये अंतराळ प्रवासात इतिहास लिहिला गेला. ब्रिटीश अब्जाधीश आणि व्हर्जिन समूहाचा प्रमुख रिचर्ड ब्रान्सन याने त्याच्या सहा सहकाऱ्यांसह १ तासाचा यशस्वी अंतराळ प्रवास करून पृथ्वीवर सुखरूप पाय टेकले. या प्रवासात भारतवंशी एरोनॉटीकल इंजिनिअर शिरीष बांदला हिचाही समावेश होता. या प्रकारे शिरीष अंतराळात झेप घेणारी चौथी भारतवंशी ठरली. यापूर्वी राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनिता विलियम्स यांनी अंतराळात झेप घेतली आहे.

व्हर्जिन गॅलेटिक्सचे व्हीएसएस युनिटी रॉकेट भारतीय वेळेनुसार रात्री सव्वा नऊच्या सुमारास पृथ्वीवर सुखरूप परतले. ७१ वर्षीय रिचर्ड सह पाच जणांनी ८ वा.१० मिनिटांनी या ऐतिहासिक उड्डाणात भाग घेतला होता. हे उड्डाण १ तासाचेच असले तरी अंतराळ प्रवासात ते मैलाचा दगड ठरले. उड्डाणाच्या वेळी ५०० लोक निरोप देण्यासाठी उपस्थित होते. सायंकाळी साडे सहा वाजता हे उड्डाण होणार होते पण हवा खराब झाल्याने ते दीड तास पुढे ढकलले गेले होते.

या उड्डाणात सहभागी असलेले सर्व व्हर्जिन कंपनीचे कर्मचारी आहेत. संस्थापक रिचर्ड १८ जुलै रोजी त्याचा ७१ वा वाढदिवस साजरा करत आहे. योजनेनुसार ज्या रॉकेट विमानाने त्यांनी अंतराळात झेप घेतली ते मूळ यान व्हाईट नाईट टू, पासून १३ किमी उंचीवर वेगळे झाले आणि पृथ्वीपासून ८८ किमी उंचीवर जाऊन पुन्हा पृथ्वीवर सुखरूप आले.

पृथ्वीबाहेर अंतराळात झेप घेणारा पहिला अब्जाधीश ठरलेला रिचर्ड ब्रान्सन याचा भारताशी संबंध आहे. त्याचे पूर्वज भारतीय होते आणि तमिळनाडूच्या कडलोर येथे त्यांची आजी पणजी राहत होत्या. रिचर्ड स्वतःला भारतीय मूळ असलेला मानतो आणि जेव्हा जेव्हा तो भारतीयांना भेटतो तेव्हा आपण नातेवाईक आहोत असे सांगतो. पुणे मुंबई हायपरलूप नेटवर्कसाठी महाराष्ट्र सरकारने व्हर्जिन ग्रुप बरोबरच करार केला आहे.

रिचर्डने २०२२ पासून नियमाने अंतराळात प्रवासी नेणार असल्याचे जाहीर केले असून त्यासाठी ६०० प्रवाशांनी अगोदरच बुकिंग केले आहे. प्रत्येक प्रवाशाला त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.