इंग्लंडचे स्वप्न भंगले- इटलीने जिंकला युरो कप

इंग्लंडने ५५ वर्षांच्या गॅपनंतर युरो कप जिंकण्याचे पाहिलेले स्वप्न धुळीस मिळवत इटलीने युरो कप २०२१ जिंकला. इंग्लंडच्या बुकायो सामाने घेतलेला पेनल्टी शूट हुकला आणि ट्रॉफी इटलीने रोमला नेली. इटलीने या रोमांचकारी सामन्यात इंग्लंडचा ३-२ असा पराभव केला. मायभूमीत होत असलेल्या या सामन्याला हजारो इंग्लंडवासी आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते मात्र त्यांच्या हाती निराशा लागली. सामना हरताच हताश झालेले प्रेक्षक एकदम शांत झाले तर दुसऱ्या बाजूला इटली समर्थकांनी आनंदाचा एकच कल्लोळ केला.

पेनल्टी शूट औट मध्ये गेलेल्या या सामन्यात इंग्लंड कप्तान हॅरी केन व स्टार खेळाडू स्टर्लिंग निष्प्रभ ठरले. इटली दुसऱ्या हाफ मध्ये फारच आक्रमक होता. इटलीचा हा सलग ३४ वा विजय आहे. इटलीने यापूर्वी १९६८ मध्ये युरो कप जिंकला होता. त्यांचा हा दुसरा विजय आहे.

इटलीच्या २२ वर्षीय गोलकिपर गीयान्लुगी डोंनारुम्माने गोल पोस्टवर जे चापल्य दाखविले त्याचे किती कौतुक करावे ते थोडे असेच म्हणता येईल. त्याने संघाला गोल घेण्यापासून वाचाविलेच पण दुसऱ्या वेळी देशाला चँपियन बनविण्यात मोठा वाटा उचलला. शूट औट मध्ये इंग्लंड कप्तान हॅरीने पहिला गोल केला त्याचबरोबर इटलीच्या डोमेनिको बेरार्डीनेही गोल केला. इंग्लंडच्या मॅग्युरेने दुसरा गोल केला पण इटलीच्या आंद्रे बेलोटोचा प्रयत्न मात्र वाया गेला आणि इंग्लंडने २-१ अशी बढत घेतली. पण इटलीच्या बुनाची आणि फेडेरीकोने दणादण दोन गोल केले आणि ३-२ अशी आघाडी घेतली. इंग्लंडचे रशफोर्ड, जडोन सांचो आणि बुकायो साका मात्र गोल करू शकले नाहीत.