१०३ वर्षानंतर दिसला लुप्त झालेला पारदर्शी ऑक्टोपस

पॅसिफिक समुद्रात खोलवर संशोधकांना १०३ वर्षापूर्वीच लुप्त झालेला काचेसारखा पारदर्शक ऑक्टोपस (रेअर ग्लास ऑक्टोपस) दिसल्याने पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १९१८ साली या प्रकारचा ऑक्टोपस अखेरचा दिसला होता आणि त्यानंतर त्याला नामशेष प्राणी श्रेणीमध्ये समाविष्ट केले गेले होते. आजपर्यंत लाखो कोट्यवधी जीवजंतू निर्माण झाले आणि त्यातील काही शेकडो वर्षापूर्वी नामशेष झाले आहे. ग्लास ऑक्टोपस असाच प्राणी मानला जात होता.

या ऑक्टोपसला ग्लास ऑक्टोपस हे नाव त्याच्या काचेसारख्या पारदर्शक त्वचेवरून दिले गेले आहे. आठ पायाच्या या दुर्लभ ऑक्टोपस ला दोन वेळा पॅसीफिक समुद्रात पाहिले गेले आणि संशोधकांमध्ये आनंदाची लहर पसरली. गेले १८२ तास संशोधक त्याचा शोध घेत आहेत.

या ऑक्टोपसची कातडी पारदर्शक असते आणि त्यातून आतील अवयव म्हणजे हृदय, पोट नुसत्या डोळ्यांनी सुद्धा सहज दिसतात. अन्य समुद्री जीवांचा शोध घेताना संशोधकांना त्याचे अचानक दर्शन झाले. हा ऑक्टोपस ११ सेंटीमीटर ते ४५ सेंटीमीटर पर्यंत असू शकतो. फिनिक्स बेटावर याचा शोध घेण्यासाठी ३४ दिवसांची एक मोहीम आखली गेली आहे. या बेटावर अनेकदा दुर्मिळ जीव आढळतात. येथेच जगातील सर्वात मोठे प्रवाळ इको सिस्टीम असून ती ११,५८० चौरस किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे.