भाविकांच्या अनुपस्थित भगवान जगन्नाथ निघाले यात्रेला

फोटो साभार एएनआय

ओरीसातील जगन्नाथ पुरी येथे करोना मुळे सलग दुसऱ्या वर्षी भाविकांच्या गर्दीशिवाय जगन्नाथ यात्रा सुरु झाली असून भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रेसह नगर भ्रमण करायला निघाले आहेत. ही यात्रा २० जुलै पर्यंत सुरु राहणार आहे. दरवर्षी या यात्रेत लाखोंच्या संखेने भाविक येतात मात्र करोना मुळे गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा भाविकांना सहभागी होता आलेले नाही. यंदा तीन हजार सेवादार आणि प्रशासन कर्मचारी या यात्रेत सहभागी आहेत. पुरी येथे रविवारी रात्री ८ पासून दोन दिवसांची संचारबंदी लागू केली गेली आहे.

ही यात्रा ३ किमी अंतरावरील गुंदीचा मंदिर येथे जाईल. हे जगन्नाथाच्या मावशीचे घर म्हटले जाते. येथे यात्रेचा ७ दिवस मुक्काम असेल. भगवान येथे येतात तेव्हा देशभरातील सर्व पवित्र तीर्थे येथे जमतात अशी भावना आहे.

अहमदाबाद येथे सोमवारी पहाटे ४ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिवारासोबत जगन्नाथ मंगलारती केली आणि येथे यात्रेची सुरवात झाली. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी यात्रा मार्गावर झाडू मारून सफाई केली. दोन्ही यात्रा ठिकाणी कडक सुरक्षा ठेवली गेली आहे. अहमदाबाद यात्रा १३ किमीची असून इतर वेळी ती १२-१३ तासात पूर्ण होते पण यंदा भाविक गर्दी नसल्याने ४ -५ तासात यात्रा पूर्ण होईल असे समजते. पुरी यात्रेचे टीव्ही वर थेट प्रक्षेपण केले जात आहे.