करोना रिकव्हरी मध्ये भारत जगात १ नंबरवर

भारतात करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी पार गेली असून सर्वाधिक रिकव्हरी मध्ये भारत जगात प्रथम क्रमांकावर आला आहे. अमेरिका २ कोटी ९० लाख रिकवरी रुग्ण संखेसह दोन नंबरवर तर ब्राझील तीन नंबरवर आहे. याच तीन देशात करोनाचा सर्वाधिक प्रभाव होता. भारताचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर गेला असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.

ब्राझील मध्ये शनिवारी करोनाचे ४८ हजार नवे रुग्ण आढळले आहेत तर भारतात हीच संख्या ४१ हजार आहे. अमेरिकेत १४ हजार नवे रुग्ण मिळाले आहेत. देशात करोनातून रिकव्हर झालेल्या रुग्णांची ६ जानेवारी रोजीची संख्या १ कोटी होती ती १३ मे रोजी ३ कोटींपेक्षा अधिक झाली आहे.

करोनाच्या सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात होत्या आणि रिकव्हरी रेट मध्ये सुद्धा महाराष्ट्र प्रथम आहे. महाराष्ट्रात करोनातून रिकव्हर झालेल्या रुग्णांची संख्या ५९ लाख आहे. वीस लाखापेक्षा अधिक रिकव्हरी असलेल्या राज्यात केरळ २९ लाख, कर्नाटक २८ लाख, तामिळनाडू २४ लाख यांचा समावेश आहे. भारतात करोनाच्या दोन लाटा आल्या असून एका दिवसात सर्वाधिक रुग्ण पहिल्या लाटेत १६ सप्टेंबर २०२० रोजी  ९७८६० होते तर दुसरया लाटेत ६ मे २०२१ रोजी हीच संख्या ४ लाख १४ हजार २८० वर गेली होती.

देशात अजूनही करोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असून एसबीआयच्या रिपोर्टनुसार ऑगस्ट मध्ये तिसरी लाट येऊ शकते आणि तिचा पिक सप्टेंबर मध्ये असू शकतो. ही लाट दुसऱ्या लाटेच्या दुप्पट असेल असेही सांगितले जात आहे.