लससाठा नसल्यामुळे मुंबईत सलग तीन दिवस लसीकरण बंद


मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध नसल्याचा चांगलाच फटका मुंबईतील लसीकरणाला बसला आहे. शुक्रवारी लससाठा न मिळाल्यामुळे शनिवारीही लसीकरण बंद राहणार आहे. लसीकरण शुक्रवारपासून सलग तीन दिवस बंद असल्यामुळे लस घेण्यासाठी मुंबईकरांना आता सोमवारची वाट पाहावी लागणार आहे.

केंद्राने नव्या लसीकरण धोरणानुसार लसींचा साठा मोठ्या प्रमाणात पुरविण्याचे आश्वासन दिले असले तरी काहीच दिवसांत पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा लसींचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी, मुंबईत १ जुलैला लसीकरण बंद ठेवण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा गुरुवारी लसींचा साठा संपल्याने शुक्रवारी लसीकरण बंद होते.

लस प्राप्त न झाल्यामुळे शनिवारी लसीकरण बंद राहणार आहे. आठवड्याची सुट्टी म्हणून रविवारी लसीकरण केले जात नसल्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी लसीकरण बंद राहील, असे पालिकेने जाहीर केले आहे. गेल्या आठवड्यात तर दोन दिवस तीनच तास लसीकरण केले गेले आणि एक दिवस ते बंदच होते. साठा नसल्यामुळे लशीची दुसरी मात्रा हवी असलेले अनेक जण ताटकळत राहिले आहेत, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आम्ही वारंवार लसींचा साठा अधिक प्रमाणात देण्याची मागणी करत आहोत. वेगाने लसीकरण करण्याची आमची तयारी असूनही पुरेसा साठा नसल्यामुळे अनेक केंद्रांवर क्षमतेपेक्षा कमी साठा द्यावा लागतो. त्यामुळे नागरिकांना लस न घेताच परत जावे लागते. ही स्थिती बदलण्यासाठी जास्तीचा साठा एकाच वेळी देण्यासाठीही पाठपुरावा केला जात असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

पालिकेला जून महिन्यात आठ लाख लसींच्या मात्रा प्राप्त झाल्या होत्या. पालिकेची दिवसाला एक लाखाहून अधिक लसीकरण करण्याची क्षमता आहे. परंतु साठा अपुरा येत असल्यामुळे दोन ते तीन दिवस पुरवावा लागतो. पालिकेला एका महिन्यासाठी किमान १५ लाख लसींचा साठा देण्याची मागणी पालिकेने याआधीही राज्य सरकारकडे केली होती, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

२१ लाख ७७ हजार ३९१ जणांनी पालिकेच्या केंद्रात पहिली मात्रा घेतली असून यातील ७ लाख ९१ हजार ६६९ जणांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. सुमारे ६३ टक्के नागरिक दुसऱ्या मात्रेच्या प्रतिक्षेत आहेत. यात ६० वर्षावरील सुमारे दोन लाख १६ हजार तर ४५ वर्षावरील सुमारे पाच लाख ७१ हजार नागरिकांचा समावेश आहे.