आमदार रवी राणांची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका


मुंबई – कोरोनाच्या संकटकाळामध्ये परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे तसेच इतर काही कारणांमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये राज्य सरकारविरोधात संतापाची भावना आहे. दरम्यान, राज्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राजकारणही जोरात सुरू आहे. दरम्यान, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात प्रश्न विचारताना भाजप समर्थक आमदार रवी राणा यांचा तोल ढळला असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.

आमदार रवी राणा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एमपीएससीच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, बेशरमचे झाड मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर लावले पाहिजे. या बेशरमच्या झाडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला संदेश जाईल, की कितीही ओरडलो, कितीही वेळा बोललो, कितीही वेळा मागणी केली, तरी राज्याचे मुख्यमंत्री बेशरम आहेत. त्यांना बेशरमचे झाडच लागू पडेल. त्यामुळे बेशरमचे झाड मी येणाऱ्या काळात लावणार आहे. जेणेकरून काही ना काही परिवर्तन त्यांच्यामध्ये होईल आणि ते दिलासा देण्याचा निर्णय घेतील.

आमदार रवी राणा यांनी नुकताच फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. एमपीएससी पास झालेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. हा मुद्दा त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये केंद्रस्थानी होता. रवी राणा यांनी त्यावरून मुख्यमंत्र्यांवर ही टीका केली. रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील आमदार आहेत. नुकत्याच आटोपलेल्या विधानसभा अधिवेशनावेळी रवी राणा यांनी तालिका अध्यक्षांसमोरील राजदंड पळवून कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता.