कोलंबो – कोरोनाची लागण श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना झाल्यामुळे भारत-श्रीलंका मालिका 4 दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला होता. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै ऐवजी 17 जुलैला खेळवण्यात येणार होता. परंतु आता पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
भारत-श्रीलंका एकदिवसीय आणि टी-20 मालिकेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल
भारतीय संघ 13 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळवण्यात येणार होते. परंतु दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे सामने पुढे ढकलण्यात आले. सर्व खेळाडूंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. परंतु खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मालिका पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाने सांगितले आहे.
पहिला एकदिवसीय 17 जुलैला खेळवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु आता नव्या वेळापत्रकानुसार पहिला एकदिवसीय सामना 18 जुलैला होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून पहिला एकदिवसीय सामना 18 जुलै, दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना अनुक्रमे 20 आणि 23 जुलैला खेळवण्यात येणार आहे.
एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती. टी-20 सामन्यांचे आयोजन 25 जुलैपासून करण्यात येणार आहे. दुसरा टी-20 सामना 27 जुलैला आणि तिसरा-टी 20 सामना 29 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय आज संध्याकाळी नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहे.