दुसऱ्यांदा बाबा झाला हरभजन, पत्नी गीताने दिला मुलाला जन्म


टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंह दुसऱ्यांदा बाबा झाला असून हरभजन सिंगची पत्नी आणि अभिनेत्री गीता बसरा हिने शनिवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला. दोघांना याआधी हिनाया नावाची एक मुलगी आहे.

हरभजन सिंग याने दुसऱ्यांदा बाबा झाल्याची गुड न्यूड इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून दिली. हरभजन आणि गीता यांच्या चाहत्यांनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यासह चाहते हरभजनच्या दुसऱ्या मुलाच्या पहिल्या फोटोची आणि नावाचीही आतुरतेने वाट पाहात आहेत.


पत्नी गीता आणि नुकत्याच जन्म घेतलेल्या बाळाची तब्येत ठणठणीत आहे, असे हरभजन याने सांगितले. छोटे हात आमचा हात पकडण्यासाठी आले आहेत. मुलाच्या जन्मामुळे माझे कुटुंब पूर्ण झाल्याचे तो म्हणाला. तसेच हरभजन याने देवाचेही आभार मानले.

दरम्यान, बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर हरभजन सिंग आणि गीता बसरा यांनी 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न केले होते. दोघांना एक मुलगीही असून आता एका मुलाचेही आगमन झाले आहे.