स्वप्नील लोणकर आत्महत्येवरून गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर टीका


पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जोरदार टीका केली. स्वप्निलचे काही घेणेदेणे अजित पवार यांना नाही, त्यांना त्यांचा मुलगा पार्थची काळजी आहे. पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का याची चिंता अजित पवार यांना असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

स्वप्नील लोणकर या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सरकारी नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वप्नीलचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. स्वप्निलच्या मृत्यूमुळे लोणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज दौंड तालुक्यातील केडगाव येथे स्वप्निलच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल हेदेखील उपस्थित होते. लोणकर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही अद्याप लोणकर कुटुंबियांची भेट घेतलेली नाही. अजित पवार यांना स्वप्निल लोणकरशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त स्वतःच्या मुलाचे म्हणजेच पार्थ पवारचे पडले आहे. पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का, याची चिंता अजित पवार यांना आहे, असा घणाघाती टोला पडळकर यांनी यावेळी लगावला.

सरकारची अनास्थाच स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नीलच्या घरच्यांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत द्या, अशी मागणी विधानसभा अधिवेशनावेळी सभागृहात केली होती. अधिवेशन होऊन गेले, पण सरकारकडून अजूनही स्वप्निलच्या घरच्यांना ठोस मदत मिळालेली नाही. सरकार नुसत्या बैठका घेणार असेल, तर मी या सरकारचा निषेध करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचा प्रतिनिधी पाठवून लोणकर कुटुंबियांची भेट घेणे गरजेचे होते. पण अद्याप तसे घडलेले नाही, अशा शब्दांत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला आहे.