IPO येण्याआधीच Paytmचे प्रेसिडंट अमित नय्यर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा राजीनामा


नवी दिल्ली : पेटीएमचा (Paytm) इनिशिअल पब्लिक ऑफर अर्थात आयपीओ (IPO) येण्याआधीच या दिग्गज डिजिटल पेमेंट कंपनीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. आयपीओसाठी जुलै अखेरीस कंपनी अर्ज करणार आहे आणि त्यापूर्वीच कंपनीच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. मीडिया अहवालांच्या मते, पेटीएमच्या प्रेसिडंट यांच्यासह अनेक वरच्या पदावरील अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये चीफ एचआर ऑफिसर रोहित ठाकूर यांचा देखील समावेश आहे.

गेल्या महिन्यात अमित नय्यर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. पेटीएमच्या फायनान्शिअल सर्व्हिसेस डिव्हिजनचे ते हेड होते. ऑगस्ट 2019 मध्ये नय्यर यांनी कंपनी जॉइन केली होती. नय्यर यांच्यावर मोठी जबाबदारी होती, ते लेंडिंग, इन्शुरन्स, डिस्ट्रीब्यूशन, वेल्थ मॅनेजमेंट आणि स्टॉक ब्रोकिंगचा बिझनेस पाहत होते. ते पेटीएमशी जोडले जाण्याआधी अॅडव्हायजरी फर्म Arpwood Capital मध्ये कार्यरत होते. याठिकाणी त्यांच्याकडे मॅनेजमेंट डायरेक्टर पदाची जबाबदारी होती. पेटीएमच्या बोर्डाने नय्यर यांचा राजीनामा स्विकारला आहे.

कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर रोहित ठाकूर यांनी देखील गेल्या महिन्यातच राजीनामा दिला होता. पेटीएममध्ये ते केवळ 18 दिवस कार्यरत होते. पेटीएम मधून राजीनामा देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये केवळ ठाकूर आणि नय्यर यांचा समावेश नाही आहे, तर अनेक बड्या अधिकाऱ्यांनी कंपनीला यावर्षी रामराम केला आहे.

जसकरण सिंह यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये पेटीएमच्या हेड ऑफ मार्केटिंग पदावरुन राजीनामा दिला होता. कंपनीमध्ये ते 6 वर्षांसाठी कार्यरत होते. पेटीएम ही कंपनी सोडल्यानंतर ते Xiaomi India च्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पदावर रुजू झाले आहेत.