राज्यातील महाविद्यालये कोरोना संकट गेल्यानंतरच सुरू होणार – उदय सामंत


बुलडाणा: राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात येणार नसल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुलडाणा येथे शनिवारी स्पष्ट केले. उदय सामंत बुलडाण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मिळालेल्या व्हेंटीलेटर्सच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. संजय गायकवाड, डॉ. संजय रायमुलकर आणि बुलाडणा बाजार समितीचे सभापती जालिंधर बुधवत यांच्यासह जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यातील गावांमध्ये कोरोनामुक्त शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या धर्तीवर महाविद्यालये कधी सुरू करणार यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली. जोवर कोरोनाचे संकट जात नाही, तोवर महाविद्यालये सुरू करणार नाही, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात देण्यात आलेले मंत्रीपद दिले गेले आहे, अशी चर्चा आहे. त्यासंदर्भाने आपली भूमिका काय? असे विचारले असता केंद्रात महाराष्ट्रातील दहा व्यक्तींनाही मंत्रीपद दिले गेले, तरी ते शिवसेनेला रोखू शकत नसल्यामुळे त्यांनी खुशाल मंत्रीपदे द्यावीत, तो त्यांचा विषय आहे. दरम्यान नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर राज्यातील शिवसेना जिल्हा प्रमुखांची तातडीने बैठक घेण्यात आली, याबाबत विचारणा केली असता शिवसेनची ताकद मोठी असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेला कोणीही रोखू शकत नसल्याचे ते म्हणाले.