मुंबई – एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत असतानाच दुसरीकडे दूधाच्या किमतीत देखील वाढ झाल्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसण्यास सुरूवात झाली आहे. अमूलने गेल्या आठवड्यात दूध विक्रीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. अमूलपाठोपाठ महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सहकारी दूध संघ असलेल्या ‘गोकुळ’ने शुक्रवारी आपल्या दुधाच्या खरेदी आणि विक्री किमतीमध्ये वाढ असून, आता मदर डेअरीच्या दूधाचे दरही वाढवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे फक्त दिल्ली आणि एनसीआरमध्येच मदर डेअरीने दरवाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली-एनसीआर वगळता इतर ठिकाणच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
‘अमूल’, ‘गोकूळ’नंतर ‘मदर डेअरी’चे दूधही महागले
अमूल आणि गोकूळनंतर मदर डेअरीने दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मदर डेअरीचे वाढीव दर उद्यापासून लागू होणार आहेत. आता मदर डेअरीचे दूध खरेदी करताना दिल्ली आणि एनसीआरमधील ग्राहकांना दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. मदर डेअरीने यापूर्वी २०१९ मध्ये दूधाच्या दरांमध्ये वाढ केली होती. सर्व प्रकारच्या दूधावर ही दरवाढ लागू असणार आहे, अशी माहिती मदर डेअरीने दिली आहे.
गेल्या वर्षभरात महागाई प्रचंड वाढली असून, कंपनीलाही महागाईचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे दूध उत्पादनावरही परिणाम झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये एक लिटर क्रीम दूध ५५ रुपयांऐवजी ५७ रुपयांना मिळणार आहे. टोन्ड दूधाचे दरही ४५ रुपयांवरून ४७ रुपये झाले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरी दिवसाला ३० लाख लिटरपेक्षा अधिक दूधाची विक्री करते. इंधनाचे वाढते दर आणि मनुष्यबळाचा वाढलेल्या खर्चामुळेही ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी आपल्या दुधाच्या खरेदी आणि विक्री किमतीमध्ये राज्यातील सर्वांत मोठा सहकारी दूध संघ असलेल्या ‘गोकुळ’ने वाढ केली. यामध्ये म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये, तर गाईच्या दूध दरात एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. याच वेळी कोल्हापूर विभाग वगळता मुंबई-पुणे महानगरातील दूध विक्रीच्या दरात दोन रुपये वाढ करण्यात आली आहे. ‘गोकुळ’तर्फे मुंबईमध्ये प्रतिदिन आठ लाख लिटर, तर पुण्यामध्ये तीन लाख लिटर दुधाची विक्री केली जाते.